Sunday, May 9, 2010

मोडीची गोडी

आज मोडीतील कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून त्याच्या लिप्यंतरासाठी मोडीतील जाणकारांची मोठी गरज आहे. या पार्श्वभूमीवर पुराभिलेख विभागाने हाती घेतलेला मोडी प्रशिक्षणाचा उपक्रम संबंधितांसाठी दिलासादायक आहे. पुराभिलेख विभागाने तयार केलेला हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम 12 दिवसांचा आहे. आजपासून हे वर्ग मुंबईत सुरू होत असून त्यांचा शुभारंभ डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते होत आहे. 

मोडीलिपीत दुसरा उकार आणि पहिली वेलांटी नसते हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. ' न थांबता न मोडता झरझर लिहिणे ' हा मोडीचा उद्देश असल्यामुळे या उकाराला आणि वेलांटीला फाटा देण्यात आला! मोडी लिहिणारा माणूस आधी एक लांबलचक रेषा मारतो आणि त्यानंतर त्याच्यालपेटदार अक्षरांची सुरू होणारी गाडी थांबते ती पूर्णविरामावरच! या लेखनात दुसरा उकार आणि पहिली वेलांटी असती , तर लेखकाला किंवा लेखनिकाला सारखे मागे यावे लागले असते आणित्यामुळे मोडीचा मूळ उद्देशच संपुष्टात आला असता. 

महाराष्ट्रात मोडी वाचणारी आणि लिहिणारी माणसं आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. या संख्येत वाढ व्हावी यासाठी काही मोडीप्रेमी व्यक्ती आणि संस्था गेल्या अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक काम करीत आहेत. त्यात आता शासकीय प्रयत्नांची भर पडली असून मोडीच्यापुनरुज्जीवनासाठी राज्याच्या पुराभिलेख खात्यानेही पुढाकार घेतला आहे. 

मोडीच्या पुनरुज्जीवनाची गरज काय , असा एक प्रश्ान् पडू शकतो. महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार असणारी मोडी लिपीतील सुमारे सात कोटी कागदपत्रे आज उपलब्ध आहेत.इतिहासाचा अभ्यास करणारे विद्याथीर् आणि संशोधकांना मोडीचे ज्ञान असल्याशिवाय या कागदपत्रांचा अन्वय लावता येणे केवळ अशक्यच! 

'
 भारतीय ऐतिहासिक आयोग ' ही या क्षेत्रात काम करणारी देशातील सवोर्च्च संस्था केंद शासनात कार्यरत आहे. इतिहासजमा होऊ घातलेल्या सर्वच लिप्यांचे पुनरुज्जीवन करून अभ्यासकांना मदत करावी , असा ठराव या आयोगाने 1979 साली घेतला. या ठरावाच्या आधारेच महाराष्ट्राचापुराभिलेख विभाग या कामासाठी पुढे सरसावला असून या अनुषंगाने अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ' मोडी प्रशिक्षण वर्ग ' हा त्यातील सर्वाधिक लोकप्रिय उपक्रम. 

मोडीचा उगम हा 12 व्या शतकातील असून यादव काळातील एक विद्वान दिवाण हेमादी पंत यांनी ती ' न मोडता न थांबता झरझर लिहिण्यासाठी ' सुरू केली. तत्कालिन राजे-महाराजे ,प्रधान आपला पत्रव्यवहार आपल्या लेखनिकाला ' डिक्टेट ' करीत असत. या लेखनिकांना झपाझप लिहून घेणे सोपे व्हावे यासाठी अशी लिपी असणे गरजेचेच होते. 

प्रामुख्याने शासकीय कामकाज जरी मोडीलिपीतून होत असले तरी बऱ्याचशा बखरी , ऐतिहासिक बाडे आणि तत्सम अन्य साहित्यही मोडीमध्ये उपलब्ध आहे. 1835 सालची प्रतापसिंहमहाराजांची दैनंदिनी मोडीत असून ' भवानी तलवार शिवाजी महाराजांनी गोवेलकर सावंतांकडून300 होनास विकत घेतली ' असा उल्लेख त्यात असल्याची माहिती पुराभिलेख विभागाचेसंचालक भास्कर धाटावकर यांनी दिली. 

आज मोडीतील कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून त्याच्या लिप्यंतरासाठी मोडीतीलजाणकारांची मोठी गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर पुराभिलेख विभागाने हाती घेतलेला मोडी प्रशिक्षणाचा उपक्रम संबंधितांसाठी फारच दिलासादायक आहे. पुराभिलेख विभागाने तयार केलेला हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केवळ 12 दिवसांचा असून त्यात रोज दोन तास शिकविले जाते. एका वेळी 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचे शुल्क दोनशे रुपये आहे. 100 मार्कांची परीक्षा असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. 

आजवर कोल्हापूर , औरंगाबाद , अलिबाग , पुणे अशा ठिकाणी हे प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले असून आजपासून हे वर्ग मुंबईत सुरू होत असून त्याचा शुभारंभ डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते होत आहे. 

महसूल खात्यातील सर्वच अधिकाऱ्यांना हे प्रमाणपत्र अनिवार्य केल्यास त्याचे महत्त्व तर वाढेलच; पण मोडीची गोडीही त्यांच्या मनात निर्माण होईल. इतिहासाचे विद्याथीर् , संशोधक , अभ्यासू पत्रकार आणि अन्य माध्यम प्रतिनिधींही मोडी समजून घेण्यासाठी पुढे आले पाहिजेत. जर आपण फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकण्याच्या गप्पा करतो तर आपली स्वत:ची मोडी लिपी आपल्याला कामाहीत नको 

करिअर बनवा - मोडी लिपीत

  
शासकीय कार्यालयं, पुरातत्व विभाग आणि कोर्टात मोडी लिप्यांतराची वारंवार गरज भासत असते. इतर क्षेत्रामधे करिअर करता करता मोडी लिप्यांतरामुळेही स्वयंरोजगार मिळवता येतो. मराठी भाषेवर प्रभुत्त्व असलेल्यांना हे क्षेत्र खुणावतंय. 

मध्यंतरी ठाण्याच्या कोर्टात काही कामानिमित्त जाणं झालं, तेव्हा तिथे एक तरुण भेटला. केमिकल इंजिनीअरिंगचा हा ओळखीचा विद्याथीर् इथे काय करतोय, या प्रश्नाने मनात कुतूहल निर्माण झालं. फावल्या वेळात मोडी लिपीतल्या मजकुराचं देवनागरीत लिप्यांतर करण्याचं काम करतो, हे कारण त्याने सांगितल्यानंतर थक्क व्हायला झालं. 

सरकारी कार्यालयं, पुरातत्त्व विभाग आणि कोर्टात अशा प्रकारची कामं निघतच असतात, त्यामुळे या क्षेत्रात लिप्यांतराची वारंवार गरज भासत असते. पण मोडी लिपीच्या जाणकारांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने या क्षेत्रातील कामांना मर्यादा येत आहेत. या ठिकाणाहून आपल्याला अधून-मधून बोलावणं येत असल्याचं तो तरुण सांगत होता. बारावीची परीक्षा झाल्यावर हौस म्हणून त्याने मोडी लिपी प्रचारक संस्थेचा काही आठवड्याचा कोर्स केला होता. तो परीक्षाही उत्तम मार्काने पास झाला होता. आज, या क्षेत्रात काम करून शिक्षणाला पूरक पैसे मिळवता येत असल्याचं त्याने सांगितलं. 

अवघ्या जगाला आज मंदीने ग्रासलंय. भल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्याही या परिस्थितीपुढे माना टाकत असल्याने उच्चपदस्थांच्या नोकऱ्याही संकटात आल्या आहेत. अशा वेळी या तरुणाने शोधलेला हा स्वयंरोजगाराचा मार्ग खूपच प्रशंसनीय वाटला. याकडे अद्यापि कुणाचं फारसं लक्ष गेलेलं नसावं. मोडी ही तशी प्राचीन भारतीय लिपी आहे. देवगिरीच्या महादेव आणि रामदेवराव यादव यांच्या कारकीदीर्त १२६० मधे हेमाडपंत महामंत्री होता. त्याने वेगवान लिहिण्याच्या गरजेपोटी या लिपीचा स्वीकार केला, त्यानंतर त्याचा प्रसार झाला असं संशोधक मानतात. हेमाडपंताने लंकेतून ही लिपी आणली, असंही काही जाणकारांनी म्हटलंय. 

मुंबईतील काही मंडळी एकत्र येऊन मोडी लिपीचे वर्ग चालवतात. कोणताही तरुण या प्रशिक्षण वर्गातून शिकून लिप्यंतरासाठी तयार होऊ शकतो. मराठीचा उत्तम जाणकार काही महिन्यातच हे प्रशिक्षण पूर्ण करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला. या कामासाठी दैनंदिन जीवनातील केवळ काही तासच खर्च करावे लागतात. मोबदल्याची रक्कम बऱ्यापैकी रोख आणि त्वरित मिळते. भाषेत रस असल्यास लिप्यंतरही सहज जमू शकतं. 

देवनागरीत प्रत्येक अक्षर सुटं असतं आणि ते लिहिताना प्रत्येक वेळी लेखणी उचलावी लागते. त्यामुळे लिहायला वेळ लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी हेमाडपंताने देवनागरीतली अक्षरं मोडून जलद लिहिता येईल, अशी मोडी लिपी शोधून काढली. विसाव्या शतकापर्यंत ही लिपी प्रचारात होती. पेशवे दप्तर संपूर्णपणे मोडी लिपीतच आहे. मोडी लिपित चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणं प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला. 

तंजावरला मराठ्यांचं राज्य होतं. तिथे अशी मोडी लिपीतली अनेक कागदपत्रं दुर्लक्षित आहेत. त्यांचं वाचन, लिप्यांतर करण्याचं काम हे एक प्रकारे समृद्ध इतिहास जतन करण्यासारखं आहे. इंग्रज अधिकाऱ्यांच्या मोडी लिपीतील सहीची बरीच कागदपत्रं पाहायला मिळतात. मिशनऱ्यांची पहिली मराठी पुस्तकंही मोडीतच आहेत. लिप्यंतराचं काम पैसे मिळवून देणारं आहेच, शिवाय त्यातून भाषिक ज्ञान आणि समाधानही मिळतं. मूळातच भाषेची आवड, भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची तयारी आणि वेगळं काही करून दाखवण्याची इच्छा असलेल्या तरुणांना हे क्षेत्र करिअरसाठी उत्तम आहे. 

Tuesday, May 4, 2010

Learn MoDi script online
I have scanned and uploaded some of the tutorial MoDi script lessons to learn and historical letters to practice. For those who wish to use the TTF MoDi script font on your computer, so here is the link to download the free hemadri.ttf font for MoDi script.