Saturday, June 15, 2013

लोक प्रतिनिधी सुद्धा शिकताहेत ‘मोडी लिपी’

लोक प्रतिनिधी सुद्धा शिकताहेत ‘मोडी लिपी’

सन १९५९ मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन बॉम्बे स्टेटच्या खेर मंत्रीमंडळाने मराठी अस्मिता, संस्कृति आणि इतिहास गेली ९०० वर्ष जपणार्‍या मोडी लिपीला ‘अनावश्यक’ असे जाहीर करून अधिकृत रित्या तिला लोक व्यवहारातून बहिष्कृत केली. छत्रपति शिवाजी महाराज आणि एकंदर मराठी साम्राज्याचा इतिहास हा सबंध मोडी लिपीतूनंच लिहीला गेला आहे. त्यामुळे मराठी इतिहास संशोधनाचे द्वारंच प्रशासनाने कायमचे बंद करून टाकले. ही भयंकर बाब सर्वप्रथम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या लक्षात आली आणि सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर त्यांनी लगेच उत्तम मोडी जाणकारांचे मराठी इतिहास संशोधनाकरिता पुढे येण्याचे आव्हान केले. ६ महिने उलटले तरी कोणी पुढे आले नाही. कसे येणार ? मोडी लिपी शिकवणे व त्याचा वापरंच प्रशासनाने बंद करून टाकला होता ! याचे चव्हाणसाहेबांना फार वाईट वाटले. पण त्याच दरम्यान एक धक्कादायक परंतु अद्भुत घटना घडली. चव्हाणसाहेबांना जपानच्या टोक्यो विश्वविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रो.फुकुज़ावा यांचे पत्र आले – तुम्ही उत्तम मोडी वाचकांचे आव्हान केल्याची बातमी आमच्या पर्यंत पोहोचली. तुमच्याकडे मोडी वाचक नसतील तर आम्ही पाठवू का ? श्री.फुकुज़ावा हे स्वतः उत्तम मोडी लिपी जाणकार होते. यशवंतराव चव्हाणस दिवंगत झाल्या नंतर रूमाल नावाच्या कबरीत मोडी पत्र तसेच पडून आहेत. अदमासे ४० कोटी मोडी लिपी दस्तावेज वाचले जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. दरवर्षी शेकडो मोडी दस्तावेज नष्ट करावे लागतात, न वाचताच. वाळवीचा प्रादुर्भाव; शाई विरळ होणे; कागद जिर्ण होणे; उंदराने कुरतडणे; बुरशी येणे ही त्या मागची कारणे आहेत.
Round Stamp blue Maharashtra copy.jpg
     एप्रिल २०१३ मध्ये असेच एका चर्चासत्रात मराठी अस्मितेच्या या दैन्यावस्थेची कथा दादर विभाग, मुंबईचे मनसे नगरसेवक श्री.गिरीष धानुरकर यांनी ऐकली. मराठी भाषेचा आव न आणता किंवा पोकळ भाषणबाजी न करता यांनी थेट स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर पश्चिम येथे जागतिक मोडी लिपी प्रसार समिती तर्फे नियमित घेण्यात येणार्‍या प्रगत मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. आपला राजकीय परिचय आपल्या कार्यालयात सोडून ते दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोडी लिपीचे प्रशिक्षण घेतात. मोडी लिपी तज्ज्ञ व संशोधक श्री. राजेश खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज तीन महिन्यांनंतर श्री.गिरीष धानुरकर आत्मविश्वासाने धडाधड अस्खलित मोडी पत्रे वाचतात. गेल्या १ महिन्यात त्यांनी तब्बल १२ पेशवेकालीन मोडी पत्रांचे लिप्यंतर केले आहे. सकाळ पासून दुपार पर्यंत महापालीकेत आणि दुपार नंतर त्यांच्या विभागाची कामे मार्गी लावने असा जबर व्यस्त नित्य दिनक्रम असतानाही ते न चूकता विद्यार्थी रूपाने आणि खर्‍या मराठी अस्मितेने मोडी लिपीचा सराव आणि मोडी पत्रांचे लिप्यंतर करतात. मराठी इतिहास आणि अस्मितेची पोकळ भाषणे न देता या मौल्यवान मराठी धरोहराची आणि दौलतीची जागरूकता मराठी जनमानसात रूजवत आहेत. त्यांच्या सहकार्यांना ते आवर्जुन मोडी लिपी शिकण्यास प्रोत्साहीत करत आहेत. या दिशेने त्यांचे पहिले पाऊल म्हणजे त्यांनी त्यांच्या पत्नीला मोडी लिपी शिकवण्यास प्रारंभ केला आहे. महापलिकेच्या शाळांमधून तरी हा किमान ऐच्छीक विषय अभ्यासक्रामात यावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. प्रशासनाच्या नावे खडे फोडत बसण्यापेक्षा गडकोट भ्रमंती करणारे ट्रेकर्स, शिवजयंती व शिवराज्याभिषेक साजरी करणार्‍या संस्था, मराठी भाषा आणि इतिहास विषयात एम.ए. करणार्‍यांनी तर आपली ही मोडी लिपी आवर्जुन शिकलीच पाहिजे. जागतिक मोडी लिपी प्रसार समितीने श्री.राजेश खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली फेसबूक आणि ऑर्कुटच्या इंटरनेट माध्यमातून जगभर जिज्ञासूंना मोडी लिपी शिकवण्यास प्रारंभ केला. अधीक माहितीसाठी खालील दूरध्वनि वर जिज्ञासूंनी संपर्क साधावा.
आज खर्‍या अर्थाने मोडी लिपी जाणकार झाले पहिले लोक प्रतिनिधी श्री. गिरीष धानुरकर.
Shri.Girish Dhanurkar

श्री.राजेश खिलारी
Round Stamp blue Maharashtra copy.jpgJagtik.modi@gmail.com
९३२३० २२२२३       

Thursday, May 19, 2011

Tuesday, April 12, 2011

स्वातंत्र्याचे स्तोत्र


मोडी गाथा


पिशाच्च लिपी (राक्षस लिपी, भूत लिपी) हीच मोडी लिपीमाझ्या मते –  


मोडी लिपी ही देवनागरीच्या तुळणेत शिघ्र लिपी होती ती टाक़ आणि बोरूच्या वापरामुळे. आता तसे नाही. फाऊंटन पेनाच्या वापरामुळे आता देवनागरी ही मोडी लिपीपेक्षा शिघ्र ठरते. गेली ७०० वर्ष केवळ मोडी लिपीनेच मराठी भाषा जीवंत ठेवली ही समज पुर्णत: चूकिची आहे. त्या ७०० वर्षातील बहुतांशी आध्यात्मीक मर्‍हाट्टी साहित्य हे देवनागरी लिपीतंच आहे. मोडी लिपीचा वापर सर्वाधीक पत्रव्यहारात व हिशेबात दिसून येतो.

महत्वाचे असे की मर्‍हाट्टीचे मराठी भाषेत परिवर्तन हे १८ व्या शतकात झाले.

मोडी लिपीचे जनक हे हेमाद्री वा हेमाडपंत आहेत किंवा त्यांनी बाजरीचे बी आणि मोडी लिपी श्रीलंकेहून आणली हा समज चूकिचा आहे. महादेवराव यादव व रामदेवराव यादव यांच्या कारकिर्दीत यादव साम्राज्याचे ते प्रधान, मुख्य सचिव असल्याने आणि याचबरोबर जमिनीची पाहणी करून महसूल ठरवणे, तो वसूल करणे, उत्पन्न ठरवणे इ. कामेही करत असल्यामुळे त्यांना श्रीकरणाधिप” (जमाबंदीचे प्रमुख)  या पदवीनेही ओळखले जाते. या कामा निमित्ताने साम्राज्याच्या मानाकोपर्‍यात त्यांची पत्रे जात असत. जर त्यांनी मोडी लिपीचा शोध लावला असता तर साम्राज्याच्या कानाकोपर्‍यातल्या अधिकार्‍यांना मोडी लिपी शिकवली कधी आणि कोठे ?
मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाह आहे. ईसापूर्व ३०० वर्षात पारसी (अरबी मध्ये फारसी) भाषेच्या आर्मायीक लिपीतून अवेस्तन आणि पहेलवी जन्मास आली. ७व्या शतकात अवेस्तन आणि पहेलवी लिपीतून नस्तलीक लिपी जन्माला आली. १०व्या शतकात नस्तलीक मधून शिकस्ते लिपी जन्मास आली. शिकस्ता म्हणजे मोडकी नस्तलीक. अपितु, ९व्या शतकातील काही शिलालेख  हे राजस्थानातून कर्नाटकात प्रचारार्थ गेलेल्या जैन भिक्षुकाचे कन्नड भाषेत परंतु मोडी लिपीत कोरलेले आढळले आहेत. तर शिकस्ता ही १०व्या शतकात अस्तीत्वात आली.

मोडी लिपीचे मौर्यी लिपीशीही साधारम्य बरेच जण जोडतात. माझ्या वाचनात एक गुजराती कागद आला आहे ज्याची लिपी ९५% मोडी लिपीशी मिळते. उर्वरीत ५% हे सध्याच्या गुर्जर लिपीचे आहेत.


पिशाच्च लिपी (राक्षस लिपी, भूत लिपी) हीच मोडी लिपी
.
मी मोडी लिपी शिकत असताना माझ्या शिक्षकांकडून बर्‍याचदा असे ऐकले होते की या मोडी लिपीला पिशाच्च लिपी किंवा राक्षस लिपी असे हे म्हणत.
.

या दिशेने अभ्यास करत असता असे वाचनात आले की इ.स.५-६ मध्ये गुणाद्यने एक ग्रंथ लिहीला बृहदकथा मंजिरी. त्याचे ७ खंड होते आणि प्रत्येकी १ लाख श्लोक होते. त्यातील कथा या राजा उदयनचा मुलगा नरवाहनदत्त याच्या जीवनातील घटनांवर आधारीत आहेत. कवी गुणाध्याने हा ग्रंथ पैशाची भाषेत लिहीला ज्याची लिपी ही पैशाच्च होती. या भाषेला पैशाची प्राकृत असे ही म्हणतात. ७ वर्षे जंगलात राहून प्रतिष्ठान (पैठण)च्या सातवाहन राजाकडे पुन्हा आला. या कथा विशेष सातवाहन राजाची राणी नागनीका हीच्यासाठी तयार केल्या होत्या. पण ती आता जिवीत नव्हती. पैशाची भाषा येत असूनही सातवाहन राजाने ते वाचण्यास नकार दिला म्हणून, कवी गुणाध्य पुन्हा विंध्या पर्वत रागांमधील जंगलात निघून केला आणि ते सातही खंड जाळण्याच्या तयारीला लागला. तेवढयात तिथी कण्वभूती नावाचा त्या आदिवासी टोळीतील ज्येष्ठ व्यक्ती आला आणि ते न जाळता त्याला पैशाची भाषा शिकवण्याचा आग्रह धरला. पण गुणाध्याचा त्या कथा जाळण्याचा निर्धार पक्का होता. मग कण्वभूतीच्या विनंतीवर एक-एक कागद जाळत असाताना कवी गुणाध्य कण्वभूतीला त्या कथा ऐकवित होता. 6 खंड जाळून झाले होते. आपली चूक लक्षात आलेल्याने राजा सातवाहनने पंडीत सर्ववरमनच्या शिष्याला तिथे पाठवले आणि तो अखेरचा भाग मागवला.  
शिवटचा खंड बृहदकथा मंजिरी ही गुणदेव आणि नंदीदेव या कवी गुणाध्याच्या शिष्यांनी पुन्हा राजा सातवाहन याच्याकडे नेऊन दिले.  त्यावर सातवाहन राजाने कथापित्त रचविला.
      दंडी ने याबाबत म्हटले आहे "भूतभाषमयीं प्राहुरद्भुतां बृहत्कृथाम् । दुर्भाग्यत:    म्हणजे मूळ ग्रंथ आता उपलब्ध नाहीं. 
.
      पैशाची भाषेचे बरेच साधारम्य पश्तो भाषेशी आहे. पिशाच लिपी मात्र पुर्ण नामशेष झाली नाही. काही वरिष्ठ अधिरार्‍यांनी ती पत्र संपर्कासाठी वापरात ठेवली.
.
हेमचंद्रादि प्राकृत व्याकरणात याचे निम्न लक्षण दिसून येतात :
  1. ज्ञ, न्य आणि ण्य यांच्या स्थानावर पर ञ्ञ चे उच्चारण, जसे सर्वज्ञ = सव्वञ्ञो, अभिमन्यू = अभिमन्ञ्ञू
  2. ण च्या स्थानावर  न, जसे गुणेन = गुनेन;
  3. त् आणि द् दोनों च्या स्थानावर त् जसे पार्वती= पव्वती, दामोदरो= तामोतरो;
  4. ल च्या स्थानावर ळ ; जसे सलिलं = सळिळ;
  5. श्, ष् स्,  या तिघांच्या स्थानावर  स्, जसे शशि= ससि, विषमो = विसमो, प्रशंसा = पसंसा;
  6. ट् च्या स्थानावर विकल्पाने  त्, जसे कुटुंबकं = कुतुंबकं;
  7. पर्वूकालिक प्रत्यय क्त्वा च्या स्थानावर तूण, जैसे गत्वा = गंतूण।
.
 पैशाची मध्ये वर्णव्यवस्था अन्य प्राकृतों च्या तुळणेत संस्कृत च्या अधिक जवळ आहे.


Thursday, August 26, 2010

अशाने मराठी इतिहास कायमचा नष्ट होईल


वर्तमान समाजाची आणि दैनंदिन घडामोडींची  नाळ ही त्या प्रदेशाच्या  इतिहासाशी जुळलेली असते. भूतकाळ नसलेल्या समाजाला आपल्या वर्तमानावर कधीच विधायक संस्कार  करता येत नाहीत. महाराष्ट्राचा ज्वलनतेजस आणि गौरवशाली इतिहास हा आता पर्यंत आपल्याला जेमतेम १०% कळला आहे आणि  % समजला आहे. ही अनभिज्ञतेची ९०% कळी विकृत लेखनाला पोषक आसते आणि याची प्रचिती आपल्याला संभाजी ब्रिगेड सारख्या टोळयांमधून दिसून येते. महाराष्ट्राचा तो ९०% अनभिज्ञ आणि अप्रकाशीत इतिहास  अजनूही मोडी कागदपत्रांत दडला आहे. हे भारतात वेगवेगळया ठिकाणी आहेत. कोटयांमध्ये त्यांची संख्या आहे. वाळवीच्या प्रादुर्भावामुळे वर्षाला हजारोनी पत्र जाळून टाकली जातात. म्हणजे ही आपली ऐतिहासीक अमुल्यावान संपत्ती आणि अप्रकाशित इतिहास कायमचाच नष्ट होत आहे की जो वर्तमान आणि भावी पिढीला कधीच कळणार नाही. रामदेवराव यादव-शहाजी-शिवाजी-शंभुजी-पेशवे हे सर्व केवळ छोटया लेख स्वरुपात शालेय पाठयपुस्तकात राहतील. असे होऊ नये म्हणुन ज्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि महाराष्ट्रीय असल्याचा स्वाभिमान आहे अशा लोकांनी मोडी लिपी शिकून या इतिहास संशोधनेच्या यज्ञेत स्वत:ही काही योगदान दिले पाहिजे. इ.स.१९५६ दरम्यान स्व.यशवंतराव चव्हाण यांनी हे ऐतिहासीक दस्तावेज मोडी लिपीतून देवनागरी लिपीत लिप्यांतर करण्यासाठी मोडी जाणकारांना खुले निमंत्रण दिले. ज्या प्रकारचा उत्स्फुर्त प्रतिसाद आला तो पाहून यशवंतराव चव्हाण थक्कंच राहिले. महाराष्ट्रातून मोडीवाचक पुढे आले नाही याचा त्यांना धक्का बसला नाही. तर त्यांना जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीच्या इतिहास विभागाकडून पत्र आले कीतुमच्याकडे मोडी लिपी वाचक नसतील तर आमच्याकडील कुशल लोक तुमच्या विनंतीवरून आम्ही पाठवू शकतो’. त्यावेळी महाराष्ट्र, इंदुर, बेळगाव, तंजावरच्या मराठी जनतेला या जपानी लोकांचे फार कुतूहल वाटले पण स्वत:ची लाज वातली नाही. आणि आज ही ती तशीच कायम आहे. या पृथ्वीवर स्वत:ची संस्कृती, भाषा, साहित्य, परंपरा, स्थापत्य, कला यांच्या जपणुकी बाबत सर्वात उदासीन वृत्ती कोणाची आहे तर ती महाराष्ट्र शासनाची. मग प्रशासकीय सरकार कोणाचेही असो. पुणेच्या भारत इतिहास संशोधक मंडळात १२ लाखांहून अधीक मोडी कागदपत्र अद्यापही रुमालात बांधलेले आहेत. ते वाचणारे आणि अचूक लिप्यांतर करणारे जेमतेम १० मोडी लिपी पटाईत असतील. एक पत्र एका दिवसात लिप्यांतरीत होऊ शकतं किंवा १० दिवस सुद्धा लागू शकतात. सर्वांना वाटतं मोडी वाचक अधीक पुढे आले पाहिजेत. सरकारलाही वाटतं मोडी वाचकांनी पुढे आले पाहिजे. “आम्हाला असं वाटतं........” एवडयावरंच सगळे थांबतात. ऐतिहासीक मोडी दस्तावेजांचे लिप्यांतर आणि लेखनाचे कार्य हा फूल-टाईम-जॉब आहे. त्यामुळे लोकांनी आणि शासनाने मोडी तज्ञांनी हे कार्य विनामूल्य करावे अशी अपेक्षा बाळगणे ही सर्वथा स्वार्थी आणि कृतघ्नतेची आहे. या मोडी लिपी प्रशिक्षणाची केंद्रे आणि मोडी दस्तावेजांचे वाचन लिप्यांतरण केंद्रे ही महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांच्या प्रमुख शहरांमध्ये तातडीने उघडण्यात यावी. तसेच इंदुर, बेळगाव तंजावर सारख्या मराठी मराठी इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या शहरांत सुद्धा अशी केंद्रे उघडावीत. महाराष्ट्रातल्या सर्वच विश्वविद्यालयांच्या एम्.ए.(मराठी) आणि एम्.ए.(हिस्ट्री) या विषयांमध्ये याचा समावेश व्हावयास हवा. महाराष्ट्र सरकारच्या धनपूंजीत कसलीही  कमी नाही. पण आपल्याच संस्कृती, भाषा,  इतिहास परंपरा जपण्याची आणि जगास  दाखवण्याची प्रबळ इच्छेचे दारिद्रय आणि कमतरता मात्र नक्कीच आहे. आंदोलन आणि  तोडफोड झाल्या शिवायआम्हाला याची  माहिती नाहीया वृत्ती आणि तत्त्वाने  चालणार्‍या शासनाने थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असल्यास याबाबत कार्यरत व्हावे. एवढया थोर कार्यासाठी भली मोठी निधी उपलब्ध करून द्यावी. कधीही निधी थकवणार्‍या आणि नोकरीची शाश्वती असलेले केंद्र उभारले जावेत. मोडी शिक्षक तज्ञांना पगार वेळचे वेळी मिळावेत या इतर शासनप्रणीत संस्थांचा दर्जा या केंद्रांना मिळावा. असे जर केले नाही तर महाराष्ट्राचा इतिहास कायमचा नष्ट होईल ! असे झाल्यास याहून मोठे कृतघ्न आणि सांस्कृतीक नैतिक दरिद्र दुसरे कोण ?

                                                                                                                                                  ......
इति वृता: