Thursday, August 26, 2010

अशाने मराठी इतिहास कायमचा नष्ट होईल


वर्तमान समाजाची आणि दैनंदिन घडामोडींची  नाळ ही त्या प्रदेशाच्या  इतिहासाशी जुळलेली असते. भूतकाळ नसलेल्या समाजाला आपल्या वर्तमानावर कधीच विधायक संस्कार  करता येत नाहीत. महाराष्ट्राचा ज्वलनतेजस आणि गौरवशाली इतिहास हा आता पर्यंत आपल्याला जेमतेम १०% कळला आहे आणि  % समजला आहे. ही अनभिज्ञतेची ९०% कळी विकृत लेखनाला पोषक आसते आणि याची प्रचिती आपल्याला संभाजी ब्रिगेड सारख्या टोळयांमधून दिसून येते. महाराष्ट्राचा तो ९०% अनभिज्ञ आणि अप्रकाशीत इतिहास  अजनूही मोडी कागदपत्रांत दडला आहे. हे भारतात वेगवेगळया ठिकाणी आहेत. कोटयांमध्ये त्यांची संख्या आहे. वाळवीच्या प्रादुर्भावामुळे वर्षाला हजारोनी पत्र जाळून टाकली जातात. म्हणजे ही आपली ऐतिहासीक अमुल्यावान संपत्ती आणि अप्रकाशित इतिहास कायमचाच नष्ट होत आहे की जो वर्तमान आणि भावी पिढीला कधीच कळणार नाही. रामदेवराव यादव-शहाजी-शिवाजी-शंभुजी-पेशवे हे सर्व केवळ छोटया लेख स्वरुपात शालेय पाठयपुस्तकात राहतील. असे होऊ नये म्हणुन ज्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि महाराष्ट्रीय असल्याचा स्वाभिमान आहे अशा लोकांनी मोडी लिपी शिकून या इतिहास संशोधनेच्या यज्ञेत स्वत:ही काही योगदान दिले पाहिजे. इ.स.१९५६ दरम्यान स्व.यशवंतराव चव्हाण यांनी हे ऐतिहासीक दस्तावेज मोडी लिपीतून देवनागरी लिपीत लिप्यांतर करण्यासाठी मोडी जाणकारांना खुले निमंत्रण दिले. ज्या प्रकारचा उत्स्फुर्त प्रतिसाद आला तो पाहून यशवंतराव चव्हाण थक्कंच राहिले. महाराष्ट्रातून मोडीवाचक पुढे आले नाही याचा त्यांना धक्का बसला नाही. तर त्यांना जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीच्या इतिहास विभागाकडून पत्र आले कीतुमच्याकडे मोडी लिपी वाचक नसतील तर आमच्याकडील कुशल लोक तुमच्या विनंतीवरून आम्ही पाठवू शकतो’. त्यावेळी महाराष्ट्र, इंदुर, बेळगाव, तंजावरच्या मराठी जनतेला या जपानी लोकांचे फार कुतूहल वाटले पण स्वत:ची लाज वातली नाही. आणि आज ही ती तशीच कायम आहे. या पृथ्वीवर स्वत:ची संस्कृती, भाषा, साहित्य, परंपरा, स्थापत्य, कला यांच्या जपणुकी बाबत सर्वात उदासीन वृत्ती कोणाची आहे तर ती महाराष्ट्र शासनाची. मग प्रशासकीय सरकार कोणाचेही असो. पुणेच्या भारत इतिहास संशोधक मंडळात १२ लाखांहून अधीक मोडी कागदपत्र अद्यापही रुमालात बांधलेले आहेत. ते वाचणारे आणि अचूक लिप्यांतर करणारे जेमतेम १० मोडी लिपी पटाईत असतील. एक पत्र एका दिवसात लिप्यांतरीत होऊ शकतं किंवा १० दिवस सुद्धा लागू शकतात. सर्वांना वाटतं मोडी वाचक अधीक पुढे आले पाहिजेत. सरकारलाही वाटतं मोडी वाचकांनी पुढे आले पाहिजे. “आम्हाला असं वाटतं........” एवडयावरंच सगळे थांबतात. ऐतिहासीक मोडी दस्तावेजांचे लिप्यांतर आणि लेखनाचे कार्य हा फूल-टाईम-जॉब आहे. त्यामुळे लोकांनी आणि शासनाने मोडी तज्ञांनी हे कार्य विनामूल्य करावे अशी अपेक्षा बाळगणे ही सर्वथा स्वार्थी आणि कृतघ्नतेची आहे. या मोडी लिपी प्रशिक्षणाची केंद्रे आणि मोडी दस्तावेजांचे वाचन लिप्यांतरण केंद्रे ही महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांच्या प्रमुख शहरांमध्ये तातडीने उघडण्यात यावी. तसेच इंदुर, बेळगाव तंजावर सारख्या मराठी मराठी इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या शहरांत सुद्धा अशी केंद्रे उघडावीत. महाराष्ट्रातल्या सर्वच विश्वविद्यालयांच्या एम्.ए.(मराठी) आणि एम्.ए.(हिस्ट्री) या विषयांमध्ये याचा समावेश व्हावयास हवा. महाराष्ट्र सरकारच्या धनपूंजीत कसलीही  कमी नाही. पण आपल्याच संस्कृती, भाषा,  इतिहास परंपरा जपण्याची आणि जगास  दाखवण्याची प्रबळ इच्छेचे दारिद्रय आणि कमतरता मात्र नक्कीच आहे. आंदोलन आणि  तोडफोड झाल्या शिवायआम्हाला याची  माहिती नाहीया वृत्ती आणि तत्त्वाने  चालणार्‍या शासनाने थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असल्यास याबाबत कार्यरत व्हावे. एवढया थोर कार्यासाठी भली मोठी निधी उपलब्ध करून द्यावी. कधीही निधी थकवणार्‍या आणि नोकरीची शाश्वती असलेले केंद्र उभारले जावेत. मोडी शिक्षक तज्ञांना पगार वेळचे वेळी मिळावेत या इतर शासनप्रणीत संस्थांचा दर्जा या केंद्रांना मिळावा. असे जर केले नाही तर महाराष्ट्राचा इतिहास कायमचा नष्ट होईल ! असे झाल्यास याहून मोठे कृतघ्न आणि सांस्कृतीक नैतिक दरिद्र दुसरे कोण ?

                                                                                                                                                  ......
इति वृता: